चंद्रपूर : चंद्रपूरात सध्या जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. यात विविध प्रकारचे पशुधन प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले असून यात पंगनूर या गाईची प्रजाती अकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ही गाय अवघी साडेतीन ते चार फूट इतकी असून दुधाळ गाय म्हणून प्रसिद्ध आहे. वर्षातुन तीन हजार लिटर दुध देण्याची क्षमता आहे.
3 जानेवारी पासून सुरू झालेल्या कृषी महोसत्वाचा आज शेवटचा दिवस, मागील 4 दिवसापासून कृषी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, बचत गटाचे स्टॉलवर अनेक शेतकरी व नागरिक भेट देत आहे, आज या महोत्सवाचा शेवटचा दिवस असून सध्या 43 इंचीची पंगणुर गाय नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चला तर मग या विशिष्ट प्रजातीविषयी आपण जाणून घेऊया.
ही आहेत गायीचे वैशिष्ट्य
गायीच्या प्रजाती तेथील भौगोलिक वातावरणानुसार जडणघडण होत असते. पंगनूर ह्या गाईच्या प्रजाती आंध्र प्रदेश येथील आहे. विशेषतः तिरुपती क्षेत्रातील पहाडी भागात ही प्रजाती आढळून येते. कृषी विषयक कामे तसेच दूध उत्पादनासाठी देखील उपयोग होतो.
तिरुपती बालाजी मंदिरात मिळतो प्रसाद
तिरुपती बालाजी मंदिर हे जगप्रसिद्ध असून दररोज येथे लाखो भाविक येत असतात. या भाविकांना जो प्रसाद वाटला जातो तो ह्या पंगनूर गाईच्या तुपापासून बनलेला असतो. त्यामुळे ह्या गाईला अध्यात्मिक महत्त्व देखील प्राप्त झाले आहे.
धोक्यात आलेली प्रजाती
ह्या प्रजातीचे संवर्धन अपेक्षितरित्या झाले नसल्याने ह्याची संख्या आता दुर्मिळ झाली आहे. त्यामुळे ही प्रजाती आता धोक्यात आली असून केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे.
चंद्रपूर – राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्ये शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘मिलेट्स ऊर्जा’ म्हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वविक्रम स्थापित करणार आहेत.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), चंद्रपूर व कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदान, चंद्रपूर येथे विष्णू मनोहर आत्मा संस्थेच्या सहकार्याने ‘मिलेट्स’ची खिचडी तयार करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मिलेट वर्ष’ म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी मिलेटच्या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.
चांदा एग्रोमध्ये विष्णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्य व सर्व भाज्यांचा वापर करून पुर्णान्न असलेली खिचडी तयार करणार आहेत. त्यासाठी ते 10 फूट व्यासाची, 5 फूट कढई वापरणार असून त्याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरला जाईल.
मध्यरात्री पासून खिचडी बनवायला मनोहर यांनी सुरुवात केली आहे, दुपारपर्यंत ही खिचडी तयार होणार असे शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.
विष्णू मनोहर यांनी याआधी दिल्ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्याण आश्रमाच्या डीलिस्टींग कार्यक्रमासाठी त्यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात विष्णू मनोहर यांनी श्री. गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता.
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात भाजीपाला संशोधन केंद्र मान्यतेचा कागद हाती आला. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार असल्याचा आनंद आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म.रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विनीता व्यास, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे, असा विचार गत महिन्यातच आला. त्यानुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली. त्यासाठी मी कृषीमंत्री श्री. मुंडे यांचा व्यक्तिश: आभारी आहे.
पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसीत झाले तरी शेतमाल हा मातीतच पिकविला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबु शेती, वनशेती, रानभाजी शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून 1 रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र हे जगात एकमेव उदाहरण आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतक-यांना राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून यात पशुप्रदर्शनी, 6750 किग्रॅ खिचडीचा विक्रम, 43 इंचाची पुंगनुर गाय, नोंदणी केलेल्या शेतक-यांना लकी ड्रॉ द्वारे शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीसे, सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण आहे. राज्याचा वित्तमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी 20 लक्ष रुपये देण्याचा निर्णय सर्वप्रथम आपणच घेतला, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतक-यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतक-यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतक-यांपैकी 85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतक-यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लक्ष शेतक-यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, बचत गटाच्या महिला, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार आदींनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली.
जिल्ह्यात दोन मधाचे गाव: चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन यासाठी प्रसिध्द आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्वाचा भाग होईल.
नोंदणी करणा-या शेतक-यांनाच धानाचा बोनस : चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने धानाला 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.
फर्निचर क्लस्टरकरीता 48 कोटी रुपये मंजूर : एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून लाकडावर कोरीव काम करणा-यांसाठी 48 कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ, मधाचे गाव म्हणून पिर्ली (ता. भद्रावती) चे उद्घाटन, मिशन जयकिसान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.
या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.
43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :
आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.
पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :
दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.
शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :
कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.
कृषी प्रदर्शन :
शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.
300 च्या वर स्टॉल :
दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.