Tag: कृषी महोत्सव

  • खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    खिचडीची वाट बघता बघता नागरिकांचीचं खिचडी झाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील चांदा क्लब ग्राउंड या ठिकाणी सुरू असलेल्या चांदा ऍग्रो कृषी प्रदर्शनात महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चांदा क्लब ग्राउंड याठिकाणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात सात हजार किलोची तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला असे सांगण्यात येत असून परंतु ही एवढ्या प्रमाणात बनवलेली खिचडी नेमकी गेली कुठे हा प्रश्नचिन्ह आम आदमी पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

    प्रदर्शनातील उपस्थित जनतेकडून सांगण्यात आले की खिचडी अर्धी सुद्धा बनवण्यात आली नाही. शहरात अनेक ठिकाणी खिचडी वाटपाचे स्टॉल लावण्यात आले होते तेथील जनता सकाळी दहा वाजता पासून तरी पाच वाजेपर्यंत या आगळ्यावेगळ्या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होती परंतु त्या सर्व जनतेच्या वाटेला निराशा आली.

     

    कारण संबंधित स्टॉल वर उपस्थित असणारे कार्यकर्ते यांनी स्टॉलवर लागलेले बॅनर काढून तेथून निघून गेले परंतु प्रत्येक येणारा व्यक्ती स्टॉल कडे बघून निराशेने परत जाताना बोलत होता जर द्यायचेच नव्हते तर बॅनर लाऊन‌ स्टाईल मारायची काय गरज होती.अशातच जनतेची आम आदमी पार्टीकडे तक्रार आली की आम्हाला लोकांना खिचडीसाठी बोलवले परंतु प्रत्यक्षात खिचडी स्टॉल पर्यंत पोहोचलीच नाही नेमकी खिचडी किती किलोची बनली हा विश्वविक्रम केवळ कागदावरच का असा प्रश्न चंद्रपूरची जनता करू लागली आहे.म्हणून आपने या चंद्रपुरातील खिचडी मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.तसेच प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की मनपाच्या शाळेमध्ये खिचडी वाटली परंतु मनपाच्या शाळेची पटसंख्या किती असाही प्रश्न आपतर्फे उपस्थित करण्यात आला.

     

    ढिसाळ नियोजनाची खिचडी?

    खिचडी बनल्यावर कृषी महोत्सव स्थळी नागरिकांची गर्दी उसळली, आधी रांगेत नागरिकांनी खिचडीचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी जास्त असल्याने नागरिक ऐकायला तयार नव्हते, खिचडी मिळाली मात्र चम्मच चा त्या ठिकाणी अभाव आढळला, अनेक नागरिक जमिनीवर बसून खिचडी खाऊ लागले होते, पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या सूक्ष्म नियोजनाचा अखेर अभाव दिसून आला. विविध प्रभागात नागरिक खिचडी ची वाट बघत होते मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या पदरी निराशा पडली.

  • चंद्रपुरात 6 हजार 750 किलोच्या खिचडी विश्वविक्रमाला सुरुवात

    चंद्रपुरात 6 हजार 750 किलोच्या खिचडी विश्वविक्रमाला सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागर्दर्शनात आयोजित चांदा एग्रो 2024 मध्‍ये शुक्रवार, दि. 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ‘मिलेट्स ऊर्जा’ म्‍हणजेच मिलेट्सचा वापर करून 6750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्‍वविक्रम स्‍थापित करणार आहेत.

     

    कृषी तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापन यंत्रणा (आत्‍मा), चंद्रपूर व कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने चांदा क्लब मैदान, चंद्रपूर येथे विष्‍णू मनोहर आत्‍मा संस्‍थेच्‍या सहकार्याने ‘मिलेट्स’ची खिचडी तयार करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 हे वर्ष ‘मि‍लेट वर्ष’ म्‍हणून घोषित केल्‍यानंतर विष्‍णू मनोहर यांनी मिलेटच्‍या प्रचार व प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्‍याचा निर्धार केला होता. त्‍यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद व नाशिक येथे त्‍यांनी मिलेटचे विविध पदार्थ तयार केले आहेत.

     

    चांदा एग्रोमध्‍ये विष्‍णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्‍य व सर्व भाज्‍यांचा वापर करून पुर्णान्‍न असलेली खिचडी तयार करणार आहेत. त्‍यासाठी ते 10 फूट व्‍यासाची, 5 फूट कढई वापरणार असून त्‍याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरला जाईल.
    मध्यरात्री पासून खिचडी बनवायला मनोहर यांनी सुरुवात केली आहे, दुपारपर्यंत ही खिचडी तयार होणार असे शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले.

     

    विष्‍णू मनोहर यांनी याआधी दिल्‍ली येथे 5 हजार किलोची ‘समरसता खिचडी’ तयार केली होती. तसेच खिचडीला राष्‍ट्रीय अन्‍न घोषित करावे, या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5 हजार किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्‍याण आश्रमाच्‍या डीलिस्‍टींग कार्यक्रमासाठी त्‍यांनी 10 हजार किलो मसालेभात व नागपुरातील खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवात विष्‍णू मनोहर यांनी श्री. गजानन महाराजांना 6500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता.

  • चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    चंद्रपुरात तयार होणार 6750 किलोग्रॅमची खिचडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे भव्यदिव्य आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटेवार उपस्थित होते.

     

    या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते खरीददार संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

     

    6750 किलोग्रॅमची खिचडी मुख्य आकर्षण : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे बगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.

     

    43 इंचाची पुंगनूर गाय विशेष आकर्षण :

     

    आंध्र प्रदेशातील चित्तुर प्रांतात आढळणारी पुंगनुर गाय हे या प्रदर्शनाचे आकर्षण राहणार आहे. ही गाय केवळ 2 फुट उंचीची असून रंग पांढरा व भुरकट असतो. वर्षभरामध्ये ही गाय 1000 लीटरहून अधिक तेही फॅटची मात्रा असलेले दूध देते, अशी मान्यता आहे. जिल्हा कृषी महोत्सवात 43 इंचाची पुंगनुर गाय विशेष आकर्षण असणार आहे.

     

    पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रम :

     

    दि.3 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता उद्घाटन समारंभ, गणेश स्तवन व गोंडी नृत्य (सादरकर्ते धनराज कोवे) सायं 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत संगीत रजनी कार्यक्रम. दि.4 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत स्थानिक लोककला कार्यक्रम. दि.5 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 भव्य विश्वविक्रमी खिचडी (6750 किग्रॅ), सायं 6 ते 8 वाजेपर्यंत श्री दर्शन महाजन, पृथ्वीवरील शेतकरी, मिलेट शो – 2 अंकी नाटक, रात्री 8 ते 10 पर्यंत श्री. अंतबुध बोरकर व संच यांचे स्थानिक आदिवासी लोककला, नाट्य एकांकिका आणि लोककला नृत्य. दि. 6 जानेवारी सायं 6 ते रात्री 10 पर्यंत सुप्रसिध्द पार्श्वगायिका श्रीमती बेला शेंडे स्वराज संगीत रजनी, तसेच चला हवा येऊ द्या फेम हास्य अभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती. शेवटच्या दिवशी 7 जानेवारी रोजी सांय 6 ते रात्री 10 पर्यंत महाराष्ट्राची लोकधारा आयोजित बहारदार कार्यक्रम व इतर कार्यक्रम.

     

    शेतक-यांसाठी आकर्षक बक्षीसे :

     

    कृषी प्रदर्शनासाठी नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी इश्वर चिठ्ठीद्वारे निवडलेल्या शेतक-यांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यात मिनी ट्रॅक्टर (28 ते 30 एच.पी.), रॉयल एनफिल्ड बुलेट (स्टॅन्डर्ड), पॉवर टिलर, पॅडी विडर, पॉवर विडर, आटा चक्की, भाजीपाला किट, पॉवर स्पेअर, चाप कटर आदींचा समावेश आहे.

     

    कृषी प्रदर्शन :

     

    शासकीय दालने, विविध कंपन्या, खाद्यपदार्थ व प्रात्याक्षिके यांचा समावेश. परिसंवादमध्ये कृषी, कृषी प्रक्रिया व पुरक व्यवसाय आधारीत चर्चासत्रांचे आयोजन, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, धान्य महोत्सवाचे आयोजन, विक्रेता खरेदीदार संमेलनाचे आयोजन, जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त तसेच उल्लेखनीय काम केलेल्या शेतक-यांचा सन्मान करणे.

     

    300 च्या वर स्टॉल :

     

    दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित होणा-या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शनासाठी 300 च्या वर स्टॉलची उभारणी करण्याचे नियेाजन आहे. यात शासकीय योजनांची माहिती व तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञान, बियाणे / निविष्ठा तंत्रज्ञान इत्यादी, कृषी व सिंचन तंत्रज्ञान, बँकिंग सेक्टर, मायक्रो स्मॉल ॲन्ड मिडीयम एंटरप्राईझेस (एम.एस.एम.ई), कृषी यांत्रिकीकरण, अवजारे, उपकरणे, धान्य, फळे व भाजीपाला, पौष्टिक तृणधान्य, शेतकरी उत्पादक कंपनी, उमेद संलग्नित महिला गट व इतर, माविम संलग्नित महिला गट व इतर नाबार्ड संलग्नित उपक्रम, फूडस्टॉल व पशुप्रदर्शनीकरीता विविध स्टॉलची उभारणी होणार आहे.