Tag: वनविभागाला निर्देश

  • जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण, वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करा – हंसराज अहिर

    जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण, वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करा – हंसराज अहिर

    News34 chandrapur

    चंद्रपूर / नागपूर – जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ठ 105 महसुली गांवे व 48 हजार हेक्टर जमिनींच्या डिफॉरेस्टेशन कार्यवाहीकरीता वन व महसुल विभागाद्वारे संयुक्त सर्व्हेक्षण करून 25 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने मुंबई येथे दि. 17 ऑक्टोंबरला घेण्यात आलेल्या सुनावणीत दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाने चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना दिल्ली येथील कार्यालयात पाचारण करीत त्यांच्याद्वारे सादर अहवाल व कार्यवाहीचा आढावा घेतला.

     

    सदर अहवाल अपूर्ण असल्याने सविस्तर वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने तयार करून डिफॉरेस्टेशन विषयक कार्यवाही शिघ्रतेने मार्गी लावण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुकाअंतर्गत असलेल्या 105 महसुली गावांच्या व हजारो हेक्टर जमिनीच्या डिफॉरेस्टेशनकरीता तालुक्यातील भाजप व अन्य सामाजिक संघटनांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे लेखी स्वरूपात तकार दाखल केली होती. या तकारीची गांभिर्याने दखल घेत दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व वनविभागाचे प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीविषयी वस्तुनिष्ठ कार्यवाही अहवाल एक महिण्याच्या आत आयोगाला सादर करण्याचे निर्देश यावेळी अध्यक्षांनी दिले होते.

     

    या सुनावणीचा आढावा घेण्याकरीता दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोगाने फेरसुनावणी घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहून आयोगाला विषयानुशंगीक अहवाल सादर केला. परंतू सदर अहवाल अपूर्ण असल्याने आयोगाने या अहवालातील त्रुटी दूर करून नव्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून आयोगाला त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले. सदर प्रश्न 60 हजाराहून अधिक जनतेच्या जिव्हाळ्याचा असल्याने त्याचे गांभिर्य लक्षात घेवून या कामाला प्राधान्यकम देत कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सुनावणीला उपस्थित संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

  • वाघाच्या मृत्यूसंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी घेतली महत्वाची बैठक

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर – विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधान सचिव, वने व राज्यातील वरिष्ठ वनाधिका-यांना नागपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत निर्देश दिले.

     

    राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध शिकारीचे प्रमाण शुन्यावर आले असले तरी विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. यासंदर्भात जनजागृती, कायदेशीर तरतूदी, प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रीत करावे व असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांनी नियोजनपुर्वक प्रयत्न करावे असेही निर्देश यावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

    गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. यावेळी गडचिरोली येथील वाघाच्या मृत्यू संदर्भात वनमंत्र्यांनी तपास करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार वन विभागाने जलद गतीने तपासाची सूत्रे हलवून सर्व आरोपींस अटक करण्यात आली असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी सांगितले.

     

    यावेळी वनमंत्री यांनी वन विकास महामंडळाच्या विविध कामांचा आढावा घेऊन ही कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    या बैठकीस प्रधान सचिव (वने) श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. महिप गुप्ता, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विकास गुप्ता, वनसंरक्षक गडचिरोली श्री. रमेश कुमार इ. अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.