Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

     

    मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात श्री. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

     

    महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

     

    चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    कर्तृत्वाचा गौरव

    ना. श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्या प्रतिष्ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार

    चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार

    News34 chandrapur

    मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा संकल्प असून, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

     

    नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंती ही कामे वेगाने पूर्ण करावीत, सूचना देखील यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी येथे घेण्यात आली. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

     

    विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. या फ्लाईंग क्लबबाबत नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेण्यात येईल असेही ना मुनगंटीवार यांनी सांगितले.

    या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा, एमएडीसी चे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

  • महावितरण मधील लाईनमन, लाईनस्टाफ यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

    महावितरण मधील लाईनमन, लाईनस्टाफ यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपुर: महाराष्ट्र राज्य चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महावितरणचा कणा म्हटल्या जाणाऱ्या लाईनस्टाफ लाईनमन यांनी दि 1 डिसेंबर ला आपल्या समस्या मांडत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनाचे निवेदन लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर तर्फे नियोजन भवन येथे नुकतेच देण्यात आले.
    महाराष्ट्र मधील वीज पुरवठा करणारी एशिया खंडांतील सर्वात मोठी कंपनी म्हणजे महावितरण.

    महावितरण आपल्या महाराष्ट्र मधील अति दुर्गम भागातील लोकांना वीज पुरवठा देण्याचे कार्य करते आणि हे महत्वाचे कार्य करणाऱ्या लाईनमन लाईनस्टाफ ला महावितरण प्रशासन चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवून अन्याय करीत आहे.

     

    महावितरण मध्ये लाईनमन लाईनस्टाफ हा एक शिकलेला ITI केलेला कुशल कामगार म्हणून घेतल्या जाते परंतु त्याला वर्ग 4 मधील चपराशी च्या ग्रेड मध्ये ठेवण्यात आले आहे.
    त्यामुळे महाराष्ट्र मधील सर्व लाईनस्टाफ यांनी धुळे येथे 1 ऑक्टोबर ला महामेळावा घेतला त्यात जवळपास 10 हजार लाईनस्टाफ उपस्थित होते.त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय वर आक्रोश व्यक्त केला आणि तिथे या मेळाव्याला सर्व महावितरण मध्ये कार्यरत 27 संघटनाना निमंत्रित करण्यात आले होते.

     

    पण लाईनस्टाफ च्या हिताचे विचार करणारे फक्त 9 संघटना उपस्थित होत्या. त्यांनी एकमत करून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने आंदोलनाचा इशारा देत लाईनस्टाफ च्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली परंतु प्रशासन ने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून 16 ऑक्टोबर 2023 ला सविस्तर आंदोलन ची नोटीस देण्यात आली.

     

    त्या नोटीस प्रमाणे 20 ऑक्टोबर 2023 ला महावितरण च्या सर्व मंडळ कार्यालय समोर द्वार सभा घेण्यात आली.
    यापुढे संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महावितरण चा कणा खाकी रक्षक लाईनस्टाफ क्रमबद्ध आंदोलन सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात आले आहे.

     

    मागण्या

    1 महावितरण लाईनमन लाईनस्टाफ कुशल कामगार असून त्यांना चपराशी च्या वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये टाकण्यात यावे.

    2 लाईनमन लाईनस्टाफ चे शहर असो की ग्रामीण कामाचे तास निश्चित करून शिफ्ट ड्युटी चार्ट प्रमाणे ड्युटी देण्यात यावी.

    3 लाईनमन लाईनस्टाफ चे कामाचे स्वरूप निश्चित नसून ते निश्चित करण्यात यावे.

    4 लाईनमन लाईनस्टाफ याना स्वतंत्र वेतन श्रेणी देण्यात यावी.

    5 लाईनमन लाईनस्टाफ यांना वाहन पेट्रोल भत्ता 20 लिटर देण्यात यावा कारण त्यांना आता कंपनी कामासाठी ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी स्वतःच्या वाहन ने जावे लागते त्यामुळे वाहन पेट्रोल भत्ता देण्यात यावा.

     

    6 वीज बिल वसुली हे काम सांघिक स्वरुपाचे असल्याने जवाबदारी निश्चित करण्यात यावी.

    7 ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य सुरक्षित साधने आणि लाईन मेंटेनन्स चे साहित्य पुरविण्यात यावे.

    8 कंत्राटी पद्धतीने नोकरभरती ना करता सरळसेवा पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी.

    अशा प्रमुख मागण्या लाईनस्टाफ कडून महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर मार्फत करण्यात आलेल्या आहे.

     

    या मागण्या मान्य झाल्या नाही तर हे आंदोलन असेच सुरू राहील आणि महाराष्ट्र राज्यात वीज समस्या वाढतील आणि महाराष्ट्र सुद्धा अंधारात जाण्याची भीती आहे असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला.

     

    निवेदन देताना विलास गजभे, निलेशकुमार जवादे, रुपेश बनकर, आदेश धानोरकर, मर्द रामटेके, पंकज गेडे, गणेश जिवतोडे, पुरोहित भीमटे व लाईनस्टाफ बचाव कृती समिती चंद्रपुर संघटना पदाधिकारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या उभारणीकरिता घेतलेल्या नियमित बैठका आणि, शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हॉस्पीटलचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा, जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, टाटा कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. कैलाश शर्मा व त्यांची टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती.

     

    चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘27 जून 2019 ला या हॉस्पीटलच्या बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले. मात्र अडीच वर्षे या रुग्णालयाचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले. गेल्या वर्षीपासून या कामाला गती देण्यात आली असून एका वर्षात 30 टक्क्यांवरील बांधकाम आज 87 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. कॅन्सर हॉस्पीटल येत्या सहा महिन्यात सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज होऊन कॅन्सर पीडितांना उपचाराकरीता उपलब्ध करावा अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी कॅन्सर फाऊंडेशनच्या संचालकांनी कॅन्सर हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

     

    हॉस्पिटलच्या गुणवत्तेत तडजोड नको’

    कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकाम, उपकरणांची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ, त्यांचे वेतन आदींसाठी गॅप फंडींगचा विषय तात्काळ मार्गी लावा. तसेच हॉस्पीटलच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करू नये. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दर पंधरा दिवसांत कामाचा आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी या कामात आता प्राधान्याने पुढे जाण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

     

    आरोग्य तपासणीच्या माध्यमातून होणार कॅन्सरचे निदान

    मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील प्रदुषण हा सुध्दा एक घटक त्यासाठी कारणीभूत राहू शकतो. तसेच ब्रेस्ट कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आदी प्रकार आज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करून कॅन्सरचे निदान करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

     

    सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह निर्मिती

    चंद्रपूर येथे 2 लक्ष 35 हजार चौरस फूट जागेवर 140 खाटांचे चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे बांधकाम होत असून हॉस्पिटलची मुख्य इमारत ग्राऊंड फ्लोअर अधिक चार मजले, रेडीएशन ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला, युटीलिटी ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला अशी राहणार आहे. याशिवाय रेडीएशन, किमोथेरपीकरीता अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आदी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

  • मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि याचे स्वरुप अधिक मोठे करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा पुरस्कार वितरण व संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम सोहळा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, काशी सिंग, समीर केने, प्रविण मोहुर्ले, नंदू रणदिवे, किशोर कापगते, प्रभाकर भोयर, चंदू आष्‍टनकर, चंदू मारगोनवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    पुरस्कार विजेत्या गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेतील विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमात ‘बेबस’ चित्रपटाच्या जाहिरात फलकाचे अनावरणही ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. गणराज रंगी नाचतो’ या मुंबई येथील ५० कलावंतांच्‍या भव्‍य संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गेल्यावर्षी मी पहिल्यांदा गणेश उत्सवाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर इथे भाजपच्या वतीने हे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनमोल भाव बघायला मिळतात. एक सूर, एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर असते. त्यावेळी जात-पात-धर्म बघितला जात नाही. चंद्रपूरमध्ये याच भावनेतून हा उत्सव साजरा होत असतो. इथे गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा सगळ्या धर्मांचे लोक सहभागी होतात, याचा मला अभिमान आहे.’ चंद्रपूरचा नागरिक म्हणून देशासाठी आपण या जिल्ह्याचे योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    ‘भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन उभा असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. त्या क्षणाला माझे उर अभिमानाने भरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी लंडनमध्ये जाऊन करार केला तेव्हा चंद्रपूरचा आवाज जगात गौरवाने पोहोचविल्याचा अभिमान वाटला. आता २२ जानेवारीला देशगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराची पुजा करतील तेव्हा त्या मंदिराच्या प्रत्येक दाराचे लाकूड चंद्रपूरचे असेल, याचा प्रत्येक चंद्रपूरकराला अभिमान वाटेल. एवढेच नव्हे तर लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात प्रवेश करताना देशातील प्रत्येक खासदाराला चंद्रपूरच्या लाकडाने तयार झालेल्या मंदिरातून जावे लागेल, ही बाब देखील तेवढीच अभिमानाची आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    राक्षसीवृत्तीचा विरोध

    ‘५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा, राक्षसीवृत्तीचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले.

     

    रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा

     

    ‘राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोगही चंद्रपुरात होणार असल्याचे ते म्हणाले.

     

    क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन

    २७ डिसेंबरला ५ वाजता विसापूरच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

     

    या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम चंद्रपूरकरांनी करावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. त्याचवेळी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन, पशू व मत्स्यसंवर्धन प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील पुरातन मंदिरांसाठी निधी देण्याची घोषणा आपण अलीकडेच केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आकाराला येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, मोरवा येथे तयार सुरू होत असलेला फ्लाईंग क्लब याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

  • 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2036 ला भारतात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 ते 31 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वर्ष 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

     

    स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार दरवर्षी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यंदा 14 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा, 17 वर्षाखालील मुले/मुली पटना बिहार व 19 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ला मिळाला आहे.

     

    याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत आयोजनाबाबत माहिती दिली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की ही स्पर्धा देशातील खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयार व्हावे आमचा मानस आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धेबाबत प्रेरणा मिळेल.

     

    4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 26 डिसेंम्बर ला नोंदणी च्या माध्यमातून होणार असून 27 डिसेंम्बर ला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असून उदघाटन कार्यक्रमात देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 3 हजार खेळाडू, 200 तांत्रिक अधिकारी, पंच, 500 स्पोर्टींग स्टाफ, स्वयंसेवक व जवळपास 500 पालकांचा सहभाग असणार आहे.

     

    आयोजित ऐथलीट खेळांमध्ये हॅमर थ्रो, हाय जम्प, लॉंग जम्प, जेव्हलीन थ्रो असे विविध खेळ होणार आहे.

    आयोजित स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील विविध भागात एलईडी टीव्ही द्वारे होणार आहे.

     

    राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करीत रायगड किल्ल्यापासून ते मंत्रालय पर्यंत व दुसऱ्या टप्प्यात गेट वे ऑफ इंडिया पासून ते चंद्रपूर जिल्ह्यात या मशालीचे आगमन होणार आहे, यादरम्यान रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातून मशालीचे आगमन होत असताना भव्य स्वागत व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     

     

    आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत 20 मैदानी बाबीचा समावेश आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून विविध स्कुटर रॅली, टॉर्च रॅली व शोभायात्रा काढत क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा समावेश करून जिल्ह्यात क्रीडा वातावरण तयार करणार आहे.

     

     

    विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षक व बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मोफत ताडोबा जंगल सफारीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

     

    ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या राज्य व देशातील खेळाडूंची मिशन ऑलम्पिक ची तयारी आहे अशी माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना आयोजनाबाबत समस्या उदभवू नये यासाठी नागपूर एअरपोर्ट, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बस स्थानक वरून बसेसची व्यवस्था, डिजिटल बुक, चॅट बॉट व टोल फ्री क्रमांकची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     

    ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी 10 वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

     

    प्रत्येकाची जबाबदारी

    जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एनजीओ, क्रीडा संस्था व विविध खेळांशी संबंधित लोकांच्या टीम निश्चित करून त्यांची यादी तयार करावी. खेळाडूंना क्रीडांगणावर ने-आण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेससोबतच शाळांच्या बसेस राखीव ठेवाव्यात. तसेच ऑनकॉल वाहने उपलब्ध ठेवावीत. स्टेडियमच्या रंगरंगोटीवर लक्ष केंद्रित करावे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धा केवळ क्रीडा विभागाच्या नाही तर आपण सगळे आयोजक आहोत, या भावनेतून प्रत्येक चंद्रपूरकराने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    राष्ट्रीय स्पर्धा दर्जेदारच होतील -क्रीडा मंत्री संजय बनसोडे

    चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मिशन ऑलिम्पिक 2036 ची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातून होईल, असेही ते म्हणाले.

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कारांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना 1 कोटी रुपये, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंना 75 लक्ष रुपये तर कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना 50 लक्ष रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. तसेच पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर संभाजीनगर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रस्तावित आहे. पुणे येथे ऑलिम्पिक भवनाकरीता पहिल्या टप्प्यात 75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

     

    मेजर ध्यानचंद यांच्या नावाने 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने आता 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. अपघातानंतर श्री. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मिळवून दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यांच्या आत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळू शकली आहे.

     

    अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , कल्पना बगुलकर, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत आदी उपस्थित होते.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मदत जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच धनादेश जारी करण्यात आले आणि सोमवारी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांना हे धनादेश सुपूर्दही करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख विसरणे शक्य नाही, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत श्री. मुनगंटीवार यांनी संकटाच्या काळात दिलासा देण्याचे काम केले आहे, अशी भावना मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

     

    वीस दिवसांच्या आत घोषणा

    श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 20 दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले..

  • बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.

     

    प्रस्ताव पाठविल्यानंतर 20 दिवसांच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, जटपुरा गेट शाखा, चंद्रपूर येथील बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    चंद्रपुरात भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे व्यक्तिमत्त्व वाघानेही हेवा करावा असे होते. आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना अभिमानाने उर भरून आला आहे. पण एवढ्यावर थांबता येणार नाही. भगवान बिरसा मुंडा यांनी स्वराज्याचा संकल्प केला होता, आपल्याला हा संकल्प सुराज्याच्या दिशेने घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी त्यांचा विचार पुढे नेणे ही काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या १२ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपा अनुसुचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूर तसेच आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिरपूरचे गोंड राजे केशवशहा आत्राम, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,प्रमोद कडू, अशोक तुमराम, माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजपा प्रदेश महिला महामंत्री अल्का आत्राम, धनराज कोवे, चंद्रकला सोयाम, नामदेव डाहुळे, आशीष देवतळे, मायाताई उईके, शितल आत्राम, शितल कुळमेथे, गंगूबाई मडावी, शुभम गेडाम, किशोर आत्राम, अरविंद मडावी, यशवंत सिडाम, विक्की मेश्राम, विजय पेंदोर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आज समाजा-समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे देशापुढे जल, वायू, ध्वनी प्रदूषणाचे आव्हान आहेच, मात्र त्यासोबत विचार प्रदूषणाचेही मोठे आव्हान आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने आयुष्य बदलले, पण मानसिक स्वास्थ बिघडले हे खरे आव्हान आहे. त्यावर मात करायची असेल तर मी वाईट वागणार नाही, मी प्रामाणिकपणे आयुष्य जगेन, दुसऱ्याची रेष पुसणार नाही स्वतःची रेष मोठी करेन, असा संकल्प करावा लागेल. हा संकल्प करण्याची प्रेरणा बिरसा मुंडा यांच्या विचारांमधून मिळणार आहे.’कर्तृत्व दाखवायचे असेल, अन्यायाविरुद्ध एल्गार करायचा असेल तर वय आडवे येत नाही, याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘१५ नोव्हेंबर १८७५ ला त्यांचा जन्म झाला आणि अवघे २५ वर्षांचे आयुष्य ते जगले. त्यातही त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध पुकारले. १९४२ ला भारत छोडो आंदोलन झाले, पण खरा एल्गार बिरसा मुंडा यांनी केला. ‘अंग्रेजो अपने देश वापस जाओ… हमारा देश हमारा राज’ अशी गर्जना त्यांनी दिली. भारतीयांच्या मनात त्यांनी हा भाव पोहोचवला,’ असे ते म्हणाले.

     

    समाजासाठी बलिदान देण्याची भगवान बिरसा मुंडा यांची वृत्ती आदर्श असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘भगवान बिरसा मुंडा यांना शिकायचे होते. त्यांच्यात शिक्षण घेण्याची जिद्द होती. त्यावेळी जर्मन मिशनरी शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागला. पण दुर्दैवाने या शाळेने सर्वांत मोठी अट ठेवली ती म्हणजे धर्मांतरण करण्याची. बिरसा मुंडा यांनी काही महिन्यांसाठी धर्मांतरण केलेही. पण एक दिवस शाळेतील एका शिक्षिकेने जेव्हा त्यांच्या समाजासाठी अपशब्द वापरले तेव्हा बिरसा मुंडा उठले आणि त्यांनी एल्गार केला. शाळेतून बाहेर पडताना त्यांनी जबरदस्तीने लागलेला धर्मही सोडला. आज विविध देश भारताच्या प्रगतीकडे वक्रदृष्टी ठेवून आहेत. त्यांच्या संघटना भारतात विषारी विचार पसरवत आहेत. पण बिरसा मुंडा यांच्यापासून प्रेरणा घेत आपण सावध राहिले पाहिजे.’ यावेळी त्यांनी अशोक तुमराम व त्यांच्या संपूर्ण टीमचे पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी अभिनंदन केले.

     

    आदिवासी समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत

    आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली, हे मी माझे भाग्य समजतो. पण २००५ मध्ये आदिवासींच्या आरक्षणावर मी विधीमंडळात चर्चा उपस्थित केली. तेव्हा माझ्याविरोधात मोर्चा निघाला. कारण मी आदिवासी समाजाची बाजू घेतली होती. ज्या समाजाने वनामध्ये, पर्यावरणामध्ये देव बघितला, त्या समाजाचा आशीर्वाद माझ्यासोबत असताना कोणतीच ताकत माझे काहीच बिघडवू शकत नाही, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

     

    तीच खरी आदरांजली ठरेल

    आदिवासी तरुणांना संधी दिली तर ते कधीही मागे राहणार नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या नैसर्गिक देणगीचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी समाजातील तरुणांना साथ देण्याचे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला केले. ज्यावेळी आपण आदिवासी समाजातील इंकम टॅक्स भरणाऱ्या शंभर तरुणांचा सत्कार याच ठिकाणी करू ती खरी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली असेल आणि तोच खरा लोकार्पण सोहळा असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ‘हजारो मंजिल का सफर हम पुरा कर सकते है… एक कदम आगे चलना होगा…’ या ओळींच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आवाहन केले.

     

    आदिवासींची प्रगती थांबवू शकत नाही

    अशोक तुमराम यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दुःखद घटना घडली. त्यांच्या धर्मपत्नी जमुना तुमराम यांचे निधन झाले. अशोक तुमराम यांनी आपले दुःख काही क्षण बाजुला ठेवून समाजासाठी इथे उपस्थित झाले. समाजासाठी झटणारे असे लोक असतील तर आदिवासी समाजाची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    आदिवासी समाजासाठी…

    मी अर्थमंत्री झाल्यानंतर श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वाचा निर्णय केला. दुर्गम भागात आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेऊन दिला आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी गावांना पायाभूत सुविधांसाठी निधीच मिळत नसताना मी अर्थसंकल्पात साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद केली आणि २ हजार ८९५ आदिवासी गावांना हा निधी थेट पोहोचवला. याचा फायदा तेथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी झाला. तेंदूपत्त्याच्या रॉयल्टीचे ७२ कोटी रुपये आदिवासींना बोनसच्या रुपात देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला, याचा ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

     

    आदिवासी तरुण होणार पायलट

    चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी समाजातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच उडण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.‘एखाद्याला व्यावसायिक वैमानिक (कमर्शियल पायलट) म्हणून परवाना प्राप्त करायचा असेल तर जवळपास ५० लाख रुपये खर्च येतो. पण गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील एखाद्या गरीब तरुणाला वैमानिक व्हायचे असेल आणि कमर्शियल पायलटचा परवाना घ्यायचा असेल तर त्यांचे ४८ लक्ष रुपये भरण्याचा निर्णय सरकारने केला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील आदिवासी तरुणांसाठी ५० टक्के आरक्षणही देण्यात आले आहे. आदिवासी तरुण जेव्हा वैमानिक होऊन आकाशात उंच उडेल, तेव्हा जिल्ह्यासह देशाचाही गौरव वाढणार आहे,’ अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

     

    वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम

    मी मंत्री नसतानाही केंद्राकडे पाठपुरावा करून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने डाक तिकीट काढले. आता त्यांच्या नावाने एक भव्य स्टेडियम चंद्रपुरात होणार आहे. २५ कोटी रुपये आधीच मंजूर झाले आहेत. पण विदर्भातील सर्वांत उत्तम स्टेडियम उभारण्यासाठी अतिरिक्त निधीला मंजुरी मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. २०३६च्या अॉलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडू घडविण्याचे काम या स्टेडियमच्या माध्यमातून होईल, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

     

    तीनशे आदिवासी मुलींसाठी वसतिगृह

    आपण एकाच ठिकाणी नव्हे तर जील्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी वसतिगृहांना मान्यता घेतली. चंद्रपूरचे वसतीगृह बांधून तयार आहे. पोंभूर्णा आणि सावलीलाही आदिवासी मुलामुलींचे वसतीगृह होणार आहे. बल्लारपुरजवळील ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहे. आणि याठिकाणी दरवर्षी तिनशे आदिवासी मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता ३०० मुलींचे वसतीगृह करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.