Tag: कृषी उत्पन्न बाजार समिती

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. यापूर्वी आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे.

     

    करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले होते. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली होती. एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही.

     

    त्यातही नोंदणी मोबाईलवर आनलाईन करुन घेतांना नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून अजूनही हजार शेतकरी नोंदणी पासून वंचित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेत शेतकऱ्यांचे हजार अर्ज येऊन पडले असताना नोंदणी करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ ला संपत आहे. त्यामुळे हजार शेतकरी पुन्हा नोंदणी पासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी शेकडो शेतकरी बांधवांसमोर सांगितले.

     

    यासाठी नोंदणी साठी राहून गेलेले शेतकऱ्यांसाठी परत १५ दिवसाची मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

  • चंद्रपुरात ठोक व्यापाऱ्यांची चिल्लर विक्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर : दाताळा मार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला यार्डमधील ठोक व्यापाऱ्यांकडून आवारात किरकोळ विक्री केली जात असल्याने शहरातील अनेक ग्राहक स्वस्त भाजीपाल्यासाठी कृउबासच्या भाजीपाला यार्डमध्ये येतात. याचा परिणाम शहरातील गंजवार्ड आणि गोलबाजारातील भाजीविक्रेत्यांवर होत असून, या दोन्ही बाजारात ग्राहकांची संख्या कमी होत असल्याने विक्रेत्यांची उपासमार होत आहे.

     

    दहा दिवसात कृउबासच्या भाजीपाला यार्डमधून किरकोळ भाजीपाला विक्री थांबविण्यात यावी, अन्यथा भाजीपाला यार्ड प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा किरकोळ भाजीपाला व्यावसायिकांसह हिमायू अली यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
    दाताळा मार्गावर कृउबासचे मोठे भाजीपाला मार्केट आहे. दूरवरून तसेच अन्य जिल्ह्यातून व राज्यातून येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणला जातो. हा भाजीपाला किरकोळ विक्रेते खरेदी करून गोलबाजार, गंजवार्ड, बंगाली कॅम्प, तुकूम येथील भाजीबाजारात ग्राहकांना विकतात.

     

    भाजीपाला यार्डमधील मोठ्या व्यापाऱ्यांना किरकोळ विक्रीची परवानगी नसतानाही अनेक व्यापारी स्वत:च्या हमालांमार्फत येथे किरकोळ विक्री केली जात आहे. त्यामुळे शहरातील ग्राहक स्वस्त भाजीपाला मिळण्याच्या अपेक्षेने भाजीपाला यार्डमधून भाजीपाला खरेदी करीत आहे. त्यामुळे गंजवार्ड, गोलबाजार व अन्य बाजारात भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीची घटली आहे. याचा परिणाम येथील किरकोळ व्यावसायिकांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होत आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर व्यावसायिकांच्या डोक्यावर वाढत आहे. याच कर्जबाजारीतून दोन व्यावसायिकांनी आपले जीवन संपविल्याचा आरोप यावेळी किरकोळ व्यावसायिकांनी केला आहे.

     

    यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाला यार्डमध्ये भाजीपाला विक्रीस विरोध केला होता. यानंतर काही महिने किरकोळ भाजीविक्री बंद करण्यात आली. तसा फलकही प्रवेशद्वारावर लावण्यात आला. मात्र, यानंतर पूर्ववत भाजी यार्डमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री केली जात आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी कृउबासच्या पदाधिकाऱ्यांसह काही व्यापाऱ्यांना नोटीस पाठविली. परंतु, भाजीयार्डमध्ये किरकोळ विक्री होत नसल्याची दिशाभूल करणारे उत्तर या नोटीसला देण्यात आले.

     

    कृउबासच्या यार्डमधील किरकोळ विक्री त्वरित बंद करण्यात यावी, अन्यथा प्रवेशद्वारावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा हिमायू अली यांच्यासह गंजवार्ड येथील भाजीपाला व्यावसायिकांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला गंजवार्ड येथील भाजीविक्रेता उपबाजार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम साखरकर, शिल्पा कांबळे, अर्चना खोब्रागडे, विरेंदर सिंग, शंकर दानव व अन्य भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.

  • मूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मुल येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी सभापती राकेश रत्नावार यांनी केली होती.
    या मागणीची गंभीर दखल राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचे कडून दिनांक १३/१०/२०२३ रोजी पत्र क्रमांक ६५५/२०२३-२४ नुसार मंजुरी प्रदान केली आहे.

     

    आजमीतीस शासकीय हमीभाव केंद्रावर विक्रीची नोंदणी सुरू होणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी शासकीय हमीभाव दराने खरेदी होणार असून धान विक्रीची नोंदणी सुरू केली जाणार आहे. जेव्हा धान काढणीची वेळ येईल तेव्हा नोंदणी करावी की, शेतीचे कामे करावे. तसेच, नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांला स्वत: उपस्थिती राहावे लागनार आहे.

     

    मूल तालूका हा धान उत्पादक तालूका म्हणून प्रसिध्द असून धानाचे मोठया प्रमाणात उत्पादन होत असते. त्यामूळे, शेतकऱ्यांकडील शासकीय हमीभाव दराने खरेदी करण्याकरिता नोंदणीची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या हिताची मागणी ना.विजयभाऊ वड्डेट्टीवार,विरोधी पक्ष नेता,विधानसभा तथा माजी मंत्री, यांनी तात्काळ मंजुरी मिळून दिल्याबद्दल बाजार समिती पदाधिकारी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.विजय वडेट्टीवार यांचे जाहीर आभार मानले आहे.

     

    मंजुरी पत्र देताना विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवर,राहुल मुरकुटे, सरपंच चांगदेव केमेकार ,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवर्,खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, संचालक हसन वाढई,विनोद कामडी आदी कांग्रेस पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.