Author: Admin

  • Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

    Chandrapur News : चोरीचे चारचाकी वाहन लपविण्याचे नवे ठिकाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील चारचाकी वाहन चोरांचा कारनामा ऐकून आपणही काही वेळासाठी चक्रावून जाणार, कारण त्या चोराने ग्रामीण भागातून चारचाकी वाहन चोरी करीत सदर वाहन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात ठेवले, मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने त्याचा भांडाफोड झाला. Chandrapur news

     

    जिल्ह्यात चोरीच्या गुन्ह्यात छडा अनेक प्रयत्नांनंतर लागतो, असे काही गुन्हे जिल्ह्यात घडले होते मात्र ते उघडकीस न आल्याने पोलीस अधीक्षक परदेशी यांनी त्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. Local crime branch

     

    24 जानेवारीला गस्तीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा चारचाकी वाहन कमी किमतीमध्ये विकण्याकरिता ग्राहक शोधत आहे, दुचाकीवर फिरत असलेल्या त्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली.

     

    26 वर्षीय वैभव डोंगरे, राहणार मोखाडा तालुका सावली असे त्या इसमाचे नाव होते, त्याने व मित्रांनी मिळून चारचाकी वाहन सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले अशी कबुली दिली व कुणाला त्या वाहनाबाबत थांगपत्ता लागू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात वाहन पार्क करून ठेवले.

     

    चोरी केलेले वाहन टाटा अल्ट्राज क्रमांक Mh34 BV 1302 स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातून जप्त केले, स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH14EX 6646 व चारचाकी वाहन असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि बोबडे, गायकवाड, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, मिलिंद जांभुळे यांनी केली.

  • Republic Day 2024 : नागरिकांनो व्यसनमुक्तीचा संकल्प घ्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Republic Day 2024 : नागरिकांनो व्यसनमुक्तीचा संकल्प घ्या – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव करून दिली आहे. या देशासाठी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचा मंगलकलश ज्यांनी आपल्या हाती दिला आहे, त्या शहिदांचे स्मरण करून देशाला व लोकशाहीला पुढे नेण्यासाठी स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    पोलिस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

     

    भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त भारत हा भाव संविधानात आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्व व्यसनांपासून मुक्त होऊन अमृत कलश हातात घेण्याचा संकल्प करणे, हाच खरा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याकडे नुकत्याच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकारी व संपूर्ण प्रशासन अभिनंदनास पात्र आहे. अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूरकरांनी ‘सियावर रामचंद्र की जय’ हा मंत्र लिहून एक आगळावेगळा विश्वविक्रम केला. त्याची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता वाघांच्या संरक्षणासोबतच जटायूचे संवर्धन करण्यात येणार आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने आता धानाचा बोनस वाढवून 20 हजार रुपये हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये मंजूर केले आहे. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपयांत भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार आहे. अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेने 15 कोटी रुपये शेतीपयोगी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. सोमनाथ (ता. मूल) येथे कृषी महाविद्यालयासाठी 135 कोटींची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या दोन वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात 5001 कि.मी. चे बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

     

    नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी मोरवा (ता. चंद्रपूर) येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून त्याचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

     

    विविध मिशनच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट : ‘मिशन फिट’ अंतर्गत जिल्ह्यात आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यात आली आहे. 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पीटल तसेच बल्लारपूर येथे कामगारांसाठी 100 खाटांचे ई.एस.आय.सी. हॉस्पीटल उभे राहात आहे. ‘मिशन स्वावलंबन’ अंतर्गत पी.एम. विश्वकर्मा योजना, कौशल्य विकासासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून 48 कोटी रुपये मंजूर झाले आहे. ‘मिशन कल्पवृक्ष’ अंतर्गत बांबु पॅलेटचा उपयोग करण्यासाठी वनशेती, बांबु शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे.

     

    जिल्ह्यात विकासाची 225 कामे : चंद्रपूर जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या पायाभुत सुविधांचा विकास वेगाने पूर्ण करून आरोग्य संस्थांचे बळकटीकरण, शिक्षण, सिंचन, जैव विविधता उद्यान, दळणवळणाची उपलब्धता आदींची कामे त्वरीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच सैनिकी शाळा, वन अकादमी, देखनी बसस्थानके, अनेक ठिकाणी ई- लायबरी, बॉटनिकल गार्डन, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, अभ्यासिका, वसतीगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल, वन विभागाची आकर्षक विश्रामगृहे, इको पार्क, मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील काँक्रीट रोड असे जवळपास 225 कामे सुरू आहेत. यापैकी काही पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहे.

     

    महानाट्य व महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची नव्या पिढीला जाणीव करून देण्यासाठी चंद्रपूर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी ‘जाणता राजा’ हे महानाट्य आणि 17, 18 व 19 फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

     

    ना . मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आश्विनी लोनगाडगे, विष्णुवर्धन येरनी, राहुल पोहाणे, सुहास बनकर, 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा व्हॉलीबॉल स्पर्धेतील सखी दोरखंडे, सई घिवे, कौशल्य, रोजगार व नाविण्यता विभागातर्फे विवेक अटलकर, अमियो दास, प्रिती पर्वे, सुरज गौरकार, प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवापदक पोलिस उपअधिक्षक राधिका फडके, पोलिस निरीक्षक सर्वश्री राजेश मुळे, शिवाजी कदम, प्रवीणकुमार पाटील, महेश कोंडावार, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे, पोक्सो कायद्याची प्रभावी जनजागृती केल्याबद्दल दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) तसेच विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून ममता भिमटे, यशोदा राठोड, संदेश मामीडवार आदींचा समावेश होता.

  • Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

    Chandrapur News :शिवा वझरकर हत्याकांडात राजकीय अँगल? पोलीस अधीक्षक परदेशी यांनी दिली महत्वाची माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अरविंद नगर येथे राहणारा ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख 25 वर्षीय शिवा वझरकर यांची 25 जानेवारीला निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या प्रकरणी 3 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. Chandrapur yuvasena

     

    तुझा बाप 300 रुपये रोजीने पोह्याच्या ठेल्यावर काम करतो, तुझी औकाद काय? हे वाक्य आहे हिमांशू कुमरे याच, त्याने शिवा वझरकर याला या शब्दात हिनवले, यावरून दोघांचा मोबाईल वर वाद झाला.

     

    हिमांशू आपल्याला असा का बोलला, याबाबत जाब विचारायला गेलेला शिवा गेला पण तो परतलाच नाही, 25 जानेवारीला अग्रवाल कोचिंग सेंटर जवळील स्वप्नील काशीकर यांच्या कार्यालयात शिवा ची धारदार शस्त्राने वार करीत हत्या करण्यात आली. Ram nagar police station

     

    स्वप्नील काशीकर याच्या कार्यालयात शिवा पोहचला त्याठिकाणी हिमांशू कुमरे आपल्या सहकाऱ्यांसोबत आधीच पोहचून होता, शिवा ने हिमांशू ला जाब विचारला असता आधी दोघांची बाचाबाची झाली, त्यानंतर वाद वाढत असताना दोघेही काशीकर याच्या कार्यालयाच्या बाहेर आले, आणि वाद मारहानी पर्यंत पोहचला.

     

    त्यामध्ये स्वप्नील काशीकर ने हिमांशू कुमरे ला कार्यालयात नेले हिमांशू जेव्हा बाहेर परतला त्यावेळी त्याच्या हातात धारधार शस्त्र होते.

     

    अचानक हिमांशू ने शिवा च्या पोटात धारदार शस्त्राने वार केला, यामध्ये शिवा खाली कोसळला, त्यानंतर हिमांशू, स्वप्नील काशीकर, रिझवान पठाण, चैतन्य आसकर, रोहित पितरकर, नाझीर खान, सुमित दाते, अन्सार खान यांनी लाथा-बुक्क्यांनी शिवा ला मारहाण करणे सुरू केले.

    शिवा सोबत आलेले हिवराळें यांनी तात्काळ शिवा ला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, पोलिसांनी आतापर्यंत या घटनेत 4 आरोपीना अटक केली असल्याची माहिती आहे.

     

    स्वप्नील काशीकर हा 2 दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता, गोंडपीपरी येथील कुलथा रेती घाटावर स्वप्नील ने सरपंच व तंटामुक्त समिती अध्यक्षला बेदम मारहाण केली होती, त्या प्रकरणात स्वप्नील काशीकर वर एट्रोसिटी व प्राणघातक हल्ला कलम 307 अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, मात्र तो जामिनावर बाहेर आला कसा हा एक शोधाचा विषय आहे, स्वप्नील च्या जामीनामागे मोठं अर्थकारण दडल्याची माहिती आहे.

     

    स्वप्नील काशीकर याला वाहतूक सेना जिल्हाप्रमुख पदावरून गोंडपीपरीच्या प्रकरणानंतर डिसेंबर महिन्यात पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी वझरकर हत्याकांडात दोषी असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, या हत्याकांडाला कसलेही राजकीय अँगल नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    पोलिसांनी या प्रकरणात 8 आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे, आरोपीमध्ये हिमांशू कुमरे हा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे.

     

  • चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या

    चंद्रपुरात ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील सरकारनगर भागात ठाकरे गट युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या हत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

     

    याप्रकरणात पोलिसांनी राजकीय पक्षातील माजी पदाधिकारी व सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाला अटक केली आहे.

     

    घटनेनंतर सरकार नगर तुकुम येथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती, गर्दी ने आरोपीच्या वाहनाची तोडफोड केली, विशेष बाब म्हणजे दोन्ही आरोपी काही दिवसांपूर्वी हाफ मर्डर च्या केस मधून जामिनावर बाहेर आले होते.

     

    मृतक व आरोपी यामध्ये काही वाद झाला होता, त्याबाबत बोलण्याकरिता मृतक आरोपीला भेटायला गेला होता, मात्र त्याठिकाणी बाचाबाची झाली आणि वाद वाढला, सदर वादात युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या पोटात धारदार शस्त्राने हल्ला केला, त्या हल्ल्यात शिवा वझरकर जागीच ठार झाला.
    शिवा हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

     

     

    या प्रकरणी फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

    घटनेनंतर पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, बल्लारपूर, घुग्घुस, भद्रावती व चंद्रपूर पोलीस दाखल झाले होते.

  • चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

    चंद्रपूरचे बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण

    News34 chandrapur

    चंद्रपूर: 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडू धोतरे यांना प्रसार भारती तर्फे निमंत्रण देण्यात आले आहे.

     

     

    देशातील मन की बात कार्यक्रमात गौरवप्राप्त शेकडो व्यक्ती – संस्था प्रतिनिधीना यंदा दिल्ली येथे प्रसार भारतीकडून निमंत्रण देत बोलविण्यात आलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचा उल्लेख 27 ऑक्टोबर 2017 रोजीच्या आकाशवाणी वरील मन की बात कार्यक्रम मध्ये इको-प्रो संस्थेच्या वतीने गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्यास सुरू असलेल्या ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’ चा उल्लेख करीत संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला स्वच्छता कार्याचा गौरव करण्यात आलेला होता. पंतप्रधान यांनी उल्लेख केला तेव्हा जवळपास या अभियानास अविरत श्रमदानाचे 200 दिवस पूर्ण झालेले होते, मनकीबात कार्यक्रम नंतरही एकूण 1020 दिवस कोविड लोकडाऊन पर्यंत हे अभियान सुरू होते.

     

    बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सुरू झालेला ‘हेरिटेज वॉक’

    सदर अभियान स्वच्छता पुरते मर्यादित न राहता पुढे याच किल्ला परकोटवरून संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करीत ‘हेरिटेज वॉक’ हा स्थानिक पर्यटनास चालना देणारा उपक्रम सुरू केला. अनेक चंद्रपूरकर नागरिक, विद्यार्थी ताडोबा येणारे पर्यटक सहभागी होऊ लागले. यासोबतच “आपला वारसा, आपणच जपुया” ही मोहीम घेऊन बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात 25 संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोटरसायकल ने नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा स्थळी भेट देत “महाराष्ट्र परिक्रमा” पूर्ण केली होती.

     

    बंडू धोतरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

    यापूर्वी बंडू धोतरे राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित झाले असून इको-प्रो संस्थेस सुद्धा हा गौरव प्राप्त झालेला आहे. भारत सरकार च्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय द्वारा देश व युवा कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवकांना “राष्ट्रीय युवा पुरस्कार” दिला जातो. पर्यावरण, वन-वन्यजीव, आपात्कालीन व्यवस्थापन, आरोग्य, रक्तदान, पुरातत्व, शालेय विद्यार्थी तसेच युवा कार्यात महत्वपूर्ण योगदान आहे.

     

    गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याचे आमंत्रण मिळाले हे माझे भाग्य आहे. हे आमच्या इको-प्रो संस्थेच्या कार्याचे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक आहे. हे अभियान सुरू करण्यासाठी आम्ही अनेक आव्हानांना तोंड दिले. पण, आमच्या एका जिद्दीने आम्ही हे अभियान यशस्वी केले.

     

    या अभियानाच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरच्या गोंडकालीन ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, आता कुठे हा प्रवास सुरु झाला असून अजून बरेच काही करणे बाकी आहे. आशा आहे की, आमच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही आपल्या समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी पुढे येतील.
    – बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो

  • कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    कोराडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्रातील सर्व महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उर्जा विभागातील प्रगत कुषल प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने महाऔष्णीक विद्युत केंद्र कोरोडी येथे उर्जा विभागातील प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आपल्या मागण्या घेऊन 17 जानेवारी पासून आमरण उपोषणाकरीता बसले आहे. त्यासंदर्भात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

     

    महाराष्ट्रातील सर्व  महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रषिक्षणार्थ्यांच्या वतीने 17 जानेवारी पासून विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषणास सुरुवात केली असून त्यातील काही प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती खराब झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. आठ दिवस होऊन देखील शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री तथा उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्र व्यवहार करुन सदर आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

     

    या आधी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या घेऊन विधानसभेत आवाज उठवला तसेच शासन दरबारी बैठकांचे आयोजन देखील केले. परंतू सरकार यावर गंभीर नसल्याची भावना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या प्रकल्पग्रस्त ऊर्जा विभागातील कुशल प्रशिक्षणार्थ्यांचा देखील या आंदोलनाला पाठींबा असून यासर्व मागण्या संदर्भात तातडीने पावले उचलावी अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आमदार प्रतिभाताई धानेारकर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

    ताडोबा अभयारण्यात थरार, पर्यटकांसमोर कंत्राटी कर्मचाऱ्याला वाघाने नेले फरफटत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अभयारण्यात 25 जानेवारीला सकाळी एक थरारक घटना घडली, वाघाने सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला करीत त्याला पर्यटकांसमोर फरफटत नेत ठार केले.

     

    ताडोबा बफर क्षेत्रातील निमढेला गेट वर हा थरार घडला, सकाळी 9 वाजताच्या सुमारास सफाई कर्मचारी 54 वर्षीय रामभाऊ रामचंद्र हनवते यांनी गेट जवळ सफाई केली, त्यांनतर ते गेट जवळील कवठाच्या झाडाजवळ गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पर्यटकांसमोर फरफटत नेत हनवते यांच्यावर हल्ला करीत ठार केले.

     

    5 ते 6 महिन्यांपूर्वी हनवते हे कंत्राटी कर्मचारी म्हणून निमढेला गेटवर रुजू झाले होते, हनवते यांचा मुलगा रणजित हनवते ताडोबा अभयारण्यात गाईड चे काम करतो.

     

    सकाळच्या सुमारास जंगल सफारीची सुरुवात असताना पर्यटकांसमोर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहे.

  • थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    थांब तुझा गेम करतो, आणि उलट त्याचाचं झाला गेम

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – क्षुल्लक वाद हा कधी मोठ्या गुन्ह्याचं कारण ठरणार हे सांगता येत नाही मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विसापूर येथे असाच एक जुना वाद उफाळला आणि त्या वादात एकाची हत्या झाली.

     

    23 जानेवारीला विसापूर येथील 40 वर्षीय सचिन वंगणे याची अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने पोटावर वार करीत हत्या करण्यात केली, याबाबत मृतकाच्या भावाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, बल्लारपूर पोलिसांनी कलम 302, 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

     

    सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी गुन्ह्याची गंभीरता बघता तात्काळ हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचे आदेश दिले, बल्लारपूर पोलीस व चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त तपास करीत 2 पथक तयार केले. सचिन ची हत्या करणारा त्याचा शेजारी 37 वर्षीय विठ्ठल उर्फ डेंनी डबरे निघाला. पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत अटक केली.

     

    प्रकरण नेमकं काय होत?

     

    सचिन व विठ्ठल यामध्ये जुना वाद होता, जेव्हा जेव्हा मृतक सचिन ला विठ्ठल दिसायचा त्यावेळी थांब तुझा गेम करतो अशी धमकी सचिन हा विठ्ठल ला द्यायचा, असं अनेकदा घडले, घटनेच्या दिवशी सुद्धा सचिन याने विठ्ठल ला धमकी देत तू इथेच थांब आज तुझा गेम करतो अशी धमकी देत घरून चाकू आणला, दोघांचा वाद झाला त्यानंतर विठ्ठल ने त्या चाकूने उलट सचिन वर वार केला, यामध्ये सचिन याचा जागीच मृत्यू झाला.

     

    असा मिळाला आरोपी

    सचिन ची हत्या केल्यावर आरोपी विठ्ठल ने पळ काढला नाही तो निवांत घरी होता, गावात अनेकांना माहीत होतं की विठ्ठल आणि सचिन या दोघांचा वाद सुरू होता, मात्र त्यावर कुणी बोलायला तयार नव्हते, विशेष म्हणजे पोलिसांनी विठठल ला संदेहाच्या आधारे चौकशीसाठी बोलावले होते, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहिती काढत या खुनाचा उलगडा केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि रमेश तळी, सपोनि विकास गायकवाड, सपोनि प्राची राजूरकर, पोउपनी वर्षा नैताम, रणविजय ठाकूर, यशवंत कुमरे, बाबा नैताम, संतोष दांडेवार, अनुप डांगे, मिलिंद चव्हाण, जमिर पठाण, नितेश महात्मे, श्रीनिवास वाभीटकर, प्रसनजीत डोरलीकर, प्रकाश मडावी व प्रसाद धुलगंडे यांनी केली.

     

  • वाळू चोरीचा नवा फंडा

    वाळू चोरीचा नवा फंडा

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल – अवैध रेती उत्खनन व विक्रीची सवय जडलेल्या रेती तस्करांना येन केन प्रकारे चोरी केल्याशिवाय चैन पडताना दिसत नाही.

     

    रेती घाट लिलाव मोहीम लांबणीवर गेली मात्र उसंत नसलेल्या रेती चोरांनी बैलबंडीचा फंडा वापरुन आपला गोरखधंदा सुरुच ठेवला आहे. तालुक्याबाहेर रेती जात नसली तरी बैलबंडया भाडयाने घेऊन शहरीभागात खूलेआम, बेभाव रेती पुरवून लुटमार सुरु असल्याचे चित्र दिसून येते. बैलबंडया वापरल्याने महसूल अधिकाऱ्यांची कटकट नाही. हा फंडा वापरुन मूल तालुक्यात दररोज शेकडो ब्रास रेती रेतीचोर काही ठिकाणी घरपोच तर काही ठिकाणी साठवणूक करीत असल्याची बोंब सुरू आहे.

     

    मूल तालुक्यात प्रस्थावित असलेल्या ९ रेती घाटांचा लिलाव प्रलंबित आहे. लिलावाअभावी परवाना
    अभावी ट्रॅक्टर द्धारे रेतीघाट वाहतुक बंद आहे. मात्रं खाजगी बांधकामांसाठी रेती ची मोठी मागणी सुरू आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही रेती तस्करांनी बैलबंडया भाडयाने घेऊन बेभाव रेतीतस्करी सुरू केली आहे. मुल तालुक्यात प्रति बंडी ९०० रुपयावर रेती पुरविणे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज मोठ्या संख्येने बैलबंडीधारक तालुक्यातील अनेक घाटांवर उपसा करताना खूलेआम दिसतात. तालुक्यातील अनेक गावांमधून पहाटे व रात्रो रेती भरलेल्या बैलबंडयाचा लोंढा बघून रेतीचोर किती शातीर होऊन आपला फंडा चालवीत आहेत हे लक्षात येत आहे.

     

    गतवषीं सुदधा असाच प्रकार सुरु असताना महसूल अधिकाऱ्यांनी बैलबंडीधारकाना वेठीस धरले होते मात्र काही राजकिय व्यक्ती यात हस्तेक्षेप करीत असल्याची चर्चा होती. बैलबंडीधारकांना काही ठरावीक
    रक्कम एका फेरीमागे देऊन तेवढीच रक्कम या रेती चोरांच्या घशात जात असल्याचे बोलल्या जाते.

     

    मूल तालुक्यात दिवसाकाठी शेकडो ब़ास रेतीचे अवैध उपसा सुरू असून यात शेकडो बैलबंडीधारकांना फुस लावून गुंतविण्यात आल्याचे कळते. सकाळी ६ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ चे दरम्यान मुल शहरात सुद्धा रेती वाहतुक करणाऱ्या बंडीच्या टोळया हमखास आढळून येतात असे बोलले जाते.

  • 2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    2 फेब्रुवारीपासून चंद्रपुरात तीन दिवस जाणता राजा महानाट्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ चंद्रपूरकरांच्या भेटीला येत आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका मार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असून 2, 3, व 4 फेब्रुवारी 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे प्रयोग होणार आहेत.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त मंगेश खवले, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे आदी उपस्थित होते.

     

    राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार पद्मविभूषण इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे  लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने फिरत्या रंगमंचावर रंगणार आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

     

    दररोज सायंकाळी 6 वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल. उंट ,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण 200 च्या वर कलाकार करणार आहेत.